सिंधुदुर्ग : “यापुढेही मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका करणार नाही. शिवाय यापूर्वी शरद पवार यांच्यावर एका शब्दाने जरी टीका केली असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर या पुढे कधीही टीका करणार नाही, असे म्हटले आहे. “शरद पवार हे माझ्या गुरु स्थानी आहेत. त्यामुळे काही झाले तरी त्यांच्यावर मी बोलणार नाही. त्यामुळे तसा कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी कधीही त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास तयार आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.



