मुंबई : शिवसेनेतील बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडण्याचं चित्रं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे सोलापूरातील माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे आमदार राजन पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान बबन शिंदे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती.
भाजपने दोन दिवसांपूर्वी पनवेल येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेत सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे हे दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती त्यामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला असा आरोप काही जणांकडून करण्यात आला आहे. शिंदे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.



