पुणे : शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही दोघे करतोय ना? हे म्हणणेही योग्य नाही असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, अजित पवार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित भागाच्या दौऱ्यावर आहेत.
ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आधीच केलीय – अजित पवार
ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आधीच केली आहे. पहिली पेरणी वाया गेली आहे, दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना sdrf चे निकष बाजूला ठेऊन आम्ही मदत करत होतो. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.. खासकरून मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
- प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर ते शक्य नाही.
मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे ना… मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, त्यांनी ते विधानसभेत दाखविलेही आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही? आज ही मी काही मुद्द्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना विचारले मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? ते म्हणाले आम्ही करतो. कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.




