गडचिरोली : अजित पवारांनी गडचिरोलीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. यावेळी अजित पवारानी शेतकऱ्यांशी बांधावरच संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपली कैफियत यावेळी अजित पवार यांच्यासमोर मांडली. धानाची शेती करण्याची शेतकऱ्यांना यावेळी अजित पवारांनी कर्जाबाबत विचारणा केली.
त्यावर बोलताना अजित पवारांनी व्याजाचं गणित ऐकून ‘अरे बापरे’ अशी प्रतिक्रिया दिली आणि तेही अवाक् झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. शून्य टक्के व्याजाच्या योजनेआधी तुम्ही कुणाकडून पैसे घ्यायचा, असा प्रश्न अजित पवार यांनी शेतकऱ्यांना विचरारला होता. त्यावर अजित पवारांना उत्तर देत शेतकऱ्यानं कसं आणि किती कर्ज, व्याज दिलं जातं, याचा हिशोबच सांगितला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जासाठी आणि कर्जाच्या परतफेडीसाठी किती कसरत होते, हे यानिमित्तानं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी पाहणी करताना बांधावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारले. शून्य टक्के व्याजाआधी तुम्ही कुणाकडून पैसे घ्यायचा, असा सवाल त्यांनी केला. त्यावर उच्चर देताना सावकार, बचतगट अशा लोकांकडून आम्ही पैसे घ्यायचो, कर्ज काढायचो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मग तेव्हा त्याची परतफेड करताना किती व्याज लागायचं, याचीही माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेकड्याला दोन ते तीन रुपये व्याज लागायचं, अशी माहिती शेतऱ्यांनी दिली. शंभरावर तीन रुपये महिन्याला व्याज द्यावं लागायचं, इतकं सोपं करुन गणित शेतकऱ्यानं सांगितलं. हे ऐकल्यानंतर शेतकऱ्यांकडून किती मोठ्या प्रमाणात व्याज घेतलं जातंय, याची दाहकता अजित पवारांना आली आणि आपसूकच त्यांच्या तोंडून ‘अरे बापरे, ते तर फार झालं’ असे शब्द निघाले.
‘सगळ्या गोष्टी केल्या. नांगरणी, पेरणी, चिखल, ही शेतीची सगळी प्रक्रिया करुन आता पुरामध्ये 25 हजार रुपयांचं एका एकरात नुकसान शेतकऱ्यांचं झालं. ज्याची पाच एक शेती आहे, त्याचं तर सव्वा लाखाच्या आसपास नुकसान झालं आहे. दुहेरी संकटात शेतकरी अडकला असून महामंडळाकडूनही शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत’ असा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे सरकारदारी शेतकऱ्यांची काळजी करणारं खरोखरंच कुणी जन्मलेलं नाहीये अजूनही, असं म्हणत शेतकऱ्यांनी अजित पवारांसमोर संताप व्यक्त केला.


