मुंबई ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी पवार यांनी यावेळी केली आहे.
अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी एका प्रश्नासंदर्भात थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही उल्लेख केल्याचं पहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून अजित पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते अहमदनगरमध्येही अशाच भागांना भेट देऊन त्या ठिकाणची पहाणी करुन आले.
अतिवृष्टीत जे नुकसान झाले आहे त्याची सगळी माहिती आपण घेतल्याचं पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करताना ज्या घरांना ओलावा आला आहे त्यांचाही समावेश करावा अशी विनंती अजित पवार यांनी सरकारला केली आहे.



