मुंबई: ईडी (ED) कार्यालयात नेऊन चौकशी आणि त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊतांना अटक करायचीच होती. त्यामुळे खोटे पेपर बनवून त्यांना अटक केली आहे. त्यांना शिवसेनेचा आवाज दाबायचा आहे. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी हे सर्व चाललं आहे. असा खळबळजनक आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.
परंतु उद्धव ठाकरे एकटे पडणार नाहीत. लाखो करोडो शिवसैनिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. आणखी संजय राऊत शिवसैनिकांमध्ये तयार करू आणि लढाई लढू, असा निर्धार सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना सोडवण्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
साध्या माणसाकडे 50 लाखाचा व्यवहार झाला असेल तर लगेच अटक करतात का? मात्र समृद्धी महामार्गात कमावलेल्या पैशातून राज्याचे राजकीय रंग सुर आहे त्याची मात्र चौकशी होत नाही. घरासाठी मित्राकडून, नातेवाईकांकडून लोन घेतलं असेल तर ते काय मनी लॉन्ड्रिंग होतंय काय? असा सवाल सुनील राऊत यांनी केला.
भाजप मुक्त महाराष्ट्र करणार….
हा देश स्वतंत्र करण्यासाठी सावरकर, टिळक, गांधी, भगत सिंह आणि सुभाषचंद्र बोस यांनी लढाच द्यायचा नाही असं ठरवलं असतं तर देश स्वातंत्र्य झाला असता का? तर नाही. भाजपला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी ही लढाई सुरू आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, असं राऊत म्हणाले.
- पत्राचाळ प्रकरणच बोगस..
पत्राचाळ बोगस आहे. त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही. एक कागद नाही. केवळ अटक करण्यासाठी त्यांना काही तरी कारण हवं होतं. शिवसेनेचा आवाज दाबायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. ईडीची कारवाई बोगस आहे. राऊतांना अटक करण्यासाठी एक फ्रेम तयार केली आहे. त्यासाठी जे कागदपत्रं लावले आहेत. ते बनावट आहेत. आम्ही कोर्टात ते एक्सपोज करू, असं ते म्हणाले.



