पुणे : फक्त ताप, थंडी, खोकला असलेल्या प्रत्येक रुग्णाची स्वाइन फ्ल्यू निदान चाचणी करू नका. तुमच्या दवाखान्यात बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) आलेल्या सामान्य लक्षणांच्या रुग्णाची तपासणी करून उपचारात कोणताच फरक पडणार नाही. त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांचीच स्वाइन फ्ल्यू चाचणी करावी, असे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील रुग्णालयांना पाठविले आहे.
शहरातील खासगी रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागात उपचारांसाठी आलेल्या रुग्णाची स्वाइन फ्ल्यू चाचणी सध्या केली जात असल्याचे दिसून येत आहे. शहरात सध्या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या रुग्णांचे निदान होत असले तरीही त्याच बरोबर आता गेल्या दोन वर्षांपासून शांत असलेल्या स्वाइन फ्ल्यूने देखिल डोके वर काढले आहे. याचे रुग्ण आता आढळत आहेत.
पण, सामान्य लक्षणांच्या रुग्णांची तपासणी सध्या रुग्णालयांकडून केली जात आहे. त्यामुळे सामान्य लक्षणांच्या रुग्णांची स्वाइन फ्ल्यू तपासणी करू नका, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.



