बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या वतीने देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरपंच ज्योती परकर तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ग्राम पं.सदस्य संदेश म्हसकर यांनी ध्वजारोहण केले.
याप्रसंगी सरपंच ज्योती परकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्वच्छतेचे महत्व पटवून देताना आपला परीसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तयार केलेल्या शहीद स्तंभाच्या प्रतिमेला मान्यवरांकडून पुष्पचक्र अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यात आले.त्याचबरोबर मारुती नाका ते बस स्थानका दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये गावातील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींबरोबरच गावातील सर्व धर्माच्या आबाल वृद्धांनी व मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत भारत माता की जय,वंदे मातरम् च्या घोषणांनी आपल्या देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले.
या सोहळ्याला ग्रामपंचायतीचे विद्यमान व माजी सरपंच, उपसरपंच,ग्राम पं.सदस्य, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण,पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, विशाल पवार,पोलीस कर्मचारी,जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कुलकर्णी,शिक्षक,शासकीय कर्मचारी,गावातील मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



