मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
विनायक मेटेंच्या निधनाआधी त्यांच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यासंदर्भातील स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. रांजणगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे.




