मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत एसटी चालवली होती. त्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. भाजपने घेतलेल्या या मागणीवर जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. भाजपने चिडून माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिले, असं ते म्हणालेत.
विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी एसटी चालवण्याच्या प्रकारावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षांवर दबाब आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवाय मी एसटीचं सारथ्य केल्यामुळे मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, असंही ते म्हणाले. पण यामुळे भाजपचे काही स्थानिक कार्यकर्ते चिडले असल्याचं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. सरकारला काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी, असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारला चॅलेंज केलंय.
माझ्याकडे लायसन्स…
जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी एसटीचं सारथ्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे एसटी चालवण्याचं लायसन्स आहे की नाही, यावरुही सवाल उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, लायसन्स माझ्याकडे आहे, असं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. ‘कायद्याने काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करवी. मी चुकलो असेन तर माझ्यावर कारवाई करावी’, असंही ते म्हणाले आहेत. एका लोकप्रतिनिधीने एसटीचं सारथ्य केल्यामुळे सर्वसामान्यांना आनंद झाला होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.



