मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रात महाविकास आघडीचे सरकार कोसळले आणि शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत एकजुट दाखवण्याचा सल्ला दिला आहे. येत्या निवडणूकांत किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) अंतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार करू शकतो, असे ते म्हणाले आहेत.
याआधी माध्यमाशी बोलताना शरद पवारांनी म्हटले होते की, जनमत तयार करण्यासाठी बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वयामुळे ते कोणतीही जबाबदारी घेण्यास उत्सुक नाहीत, असे पवार म्हणाले होते.
यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीकी देखील केली होती. अच्छे दिन आणणे, इंटरनेटद्वारे गावे जोडणे आणि प्रत्येक घरात शौचालये, पाणी आणि वीज देणे यासह २०१४ पासून दिलेले एकही आश्वासन पूर्ण करण्यात नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता.



