पुणे : मागील दोन वर्षात राज्यसह देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे गणेश उत्सवावर बंदी ठेवण्यात आली होती. यंदाच्या गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे नागरिकांच्या मनात गणेशोत्सव दरम्यान आनंदाला उधाण होते. मागील दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज निरोप देण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. पुणे शहरात ठिकठिकाणी रांगोळी व फुलांची सजावट करून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकासह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली.


गणपतीच्या स्वागतासाठी पुण्यातील अलका चौकात साडेतीनशे फूट लांबीची रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळीसाठी १ हजार किलो गुलाल, दीड हजार किलो पांढरी रांगोळी, २०० किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे. मानाच्या गणपतीच्या विसर्जनावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती सर्वात चर्चेची ठरली.

गणेश विसर्जनाला सुरुवात करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार व सुमित्रा अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला. रात्री १० च्या सुमारास कसबा आणि तांबडी जोगेश्वरी नंतर आता गुरूजी तालीम गणपतीचेही विसर्जन झाले आहे. त्यानंतर आता तुळशीबाग आणि केसरीवाडा या दोन मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालिम मंडळासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ढोल पथकासोबत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांनी दगडूशेठ गणपती दर्शन घेऊन आरती केली.

गणपती हा सगळ्यांचा.. गणेशोत्सवाचा आनंद घेण्याचा मोह आवरणे कठीणच… पोलीस महिलेने आपल्या कला सादर केली





