पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांचा काळ निर्बंधांमध्ये घालवल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव लोकांनी दणक्यात साजरा केला. राज्यात पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका सर्व नियम धाब्यांवर बसवणाऱ्या ठरल्या. पुण्यातील मिरवणूक तब्बल ३० तास चालली. यामध्ये ढोल-ताशे आणि डीजेच्या आवाजांनी अतिधोकादायक पातळी ओलांडली. १२८.५ डिसिबलपर्यंत पुणेकरांनी डीजेचा दणदणाट ऐकला. यावरुन राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी परखड शब्दांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. धिंगाणेबाज आणि राडेबाज सरकार अशा शब्दांत त्यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी विसर्जन मिरवणुकांमधील गैरप्रकारांवर बोट ठेवलं असून फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिंदे-फडणवीस यांच्या तालावर नाचणारे प्रशासन आणि पुण्याचे पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी महोदय हा धिंगाणा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत चालण्याची परवानगी द्या म्हणजे धिंगाण्यात खंड पडणार नाही. धिंगाणेबाज आणि राडेबाज सरकार! अशा शब्दांत चौधरी यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह प्रशासनावर सडकून टीका केली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा झाला तरी चालेल रुग्णालयातील पेशंट्स यांच्यासह घरातील लहान मुलांना आणि रूग्णालयात आवाजाचा जीवघेणा त्रास झाला आणि वृद्धांच्यावतीनं ज्यांना या दहा दिवसात आयुष्य नकोसं झालं होतं या सर्वांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार केला पाहिजे. गांधीगिरी करा. विवेक थोडाफार जागा झाला तर फायदाच आहे, असंही विश्वंभर चौधरींनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेरंब कुलकर्णींचा सरकारला टोलादरम्यान, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले हेरंब कुलकर्णी यांनी सरकारची उत्सवी सरकार अशा शब्दांत संभावना केली आहे. राज्यातील सरकारला डीजे सरकार हेच नाव द्यावं का? असा सवालही त्यांनी केला आहे.




