औरंगाबाद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्यभर दौरे करून आपल्या गटाला बळ देत आहेत. पुणे-मुंबई येथे शिंदे यांच्या सतत भेटीगाठी सुरू आहे. आता शिंदे यांनी महाराष्ट्रातील इतर विभागातही दौरे सुरू केले आहेत. मात्र या दौऱ्यांमध्ये आयोजित सभेत गर्दीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पैठणमधून समोर आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार असून ते पैठण येथे सभा घेणार आहेत. मात्र या सभेला हजार राहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत आदेश देण्यात आले आहेत. या सभेला हजर राहण्यासाठी ४२ गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय आदेश देण्यात आले आहेत. या बाबतच पत्रक समोर आलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदनीसांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. शासकीय सुट्टी नसताना कामकाज सोडून सभेला येण्याची नोटीस अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना देण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी पैठण येथे सकाळी १० वाजता सभा घेणार आहेत. या सभेला सकाळी १० वाजता हजर रहा, असे आदेश शासनाने काढले आहे.



