मुंबई 12 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं. कारण, कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार हे व्यासपीठावरुन तडकाफडकी निघून गेले होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता अजित पवार यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन निघून गेलो नव्हतो, तर वॉशरूमसाठी गेलो होतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
वॉशरूमसाठी गेलो तरी मीडियामध्ये अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या गेल्या, हे बरं नाही असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी नाट्याबाबतच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी दिल्लीतील त्या घडामोडी वरती मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. या अधिवेशनात सर्व नेत्यांची भाषणे सुरू होती. मात्र, अजित पवार भाषण न करताच ते तडकाफडकी व्यासपीठावरुन निघून गेले. जयंत पाटील यांना आपल्यापूर्वी बोलण्याची संधी दिल्याने अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा समोर आली होती. विशेष म्हणजे अजित पवार हे व्यासपीठावरुन निघून जात असताना प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना थांबण्याची विनंती केल्याचंही दिसून आलं. मात्र, अजित पवार आलेच नाहीत.



