पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूसंपादन कायद्यानुसार करण्याबाबत धोरण आखण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) कंपनीने आतापर्यंत केलेल्या आहेत. सर्व कागदोपत्री कार्यवाहीचा अहवाल ‘एमआयडीसी’कडे सुपुर्त करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत पुरंदर येथील विमानतळ अधिसूचना काढण्याचे नकाशे, आदेश ‘एमआयडीसी’ला दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त राव यांनी जिल्हाधिकारी, एमएडीसी, एमआयडीसी आणि भूसंपादनासाठी नेमलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यां समवेत आठवडाभरापूर्वी बैठक घेतली.
यावेळी राव यांनी पुरंदर विमानतळाच्या जुन्या जागेसंदर्भात अधिसूचित केलेल्या जमिनीच्या सर्वेक्षण क्रमांकाचे सर्व तपशीलवार अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेले बाधित गावांतील जागांचे सर्वेक्षण क्रमांक सामाईक केल्यास ‘एमआयडीसी’ स्वतंत्र नकाशे तयार करेल. त्यामुळे अधिसूचना जारी करण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.




