मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी सवांद साधला आणि वेदांत प्रकरणावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे आंदोलन सुरू केले होते. सीतारामन यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या मुखपत्रातून संताप व्यक्त करत ही कुठली आगपाखड ? असं म्हणत काही सवाल उपस्थित केले आहेत.
वेदांतसारखा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रकल्प, त्यामुळे निर्माण होणारा लाखावर जनतेचा रोजगार एक झटक्यात हिरावला गेला, त्या दुःखाचा, वेदनेचा प्रश्न आहे. हे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये ? या वेदनेचा हुंकार मराठी जनतेने देऊ नये ? त्याचा जाबही केंद्र सरकारला विचारू नये? तो विचारला तर त्यावरूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आगपाखड करायची, हा कुठला प्रकार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
हा प्रकल्प गुजरातमध्येच व्हावा, अशी मागणी गुजरातमधील जनतेने कुठे आणि कधी केली ? फक्त केंद्र सरकारचीच मंजुरी बाकी असताना प्रकल्प महाराष्ट्रातून गायब कसा झाला ?महाराष्ट्राच्या मनात उसळणारे असे असंख्य रास्त सवाल आहेत. आधी त्यांचे जवाब द्या आणि मग विरोधकांवर आगपाखड करा असे शिवसेनेने म्हटले आहे. वेदांत हा मोठा प्रकल्प गुजरातला गेला याचा पोटशूळ महाराष्ट्राला कधी होणार नाही. शिवसेना तर गुजरातला नेहमी जुळा भाऊ मानत आली आहे, पण प्रश्न महाराष्ट्राच्या न्याय्य हक्काचाही आहेच असे स्पष्ट मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.



