मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या १५ आमदारांमध्ये कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांचा समावेश आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीकडून आज चौकशी करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता ठाकरे गटाच्या निष्ठावंत आमदारांवर चौकशीचा फास आवळला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मात्र, या प्रकारामुळं जिल्हा शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आणि मधल्या सत्तांतराच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीच्या पथकाकडून आज कणकवली शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली. याबाबतचा तपशील एसीबी कडून देण्यात आला नसला तरी वैभव नाईक यांनी अशा कितीही चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत असे म्हटले आहे.



