सातारा : नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यापासून दोन्ही राजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर कास महोत्सवावरून टीका केली होती. याबाबत उदयनराजेंना पत्रकारांनी विचारले असता त्यांच्या हटके शैलीत राजेंनी उत्तर दिलंय. आमदार शिवेंद्रराजेंचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा एक दिवसही जात नाही. मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ते माझा प्रचार करतात. माझे ते मुख्य प्रचारक आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातलं वैर उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसी आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी अधिक रंगताना पाहायला मिळतीये. दररोज कुणी ना कुणी एकमेकांना शाब्दिक चिमटा काढायचा अन् दुसऱ्याने त्याचं उत्तर द्यायचं, हे गेली महिना दोन महिन्यापासून सुरुच आहे. आज शिवेंद्रराजेंच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी आपल्या खास स्टाईलने चुलत बंधूंना चिमटे काढले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक आणि नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे यांना मारहाण करण्यात आली आहे. एका नगरसेवकाकडूनच ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसंच सदर नगरसेवक हा शिवेंद्रराजेंचा समर्थक असल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून ‘दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो,’ असा शब्दांत उदयनराजेंनी आव्हान दिलं आहे.



