मुंबई – छगन भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा मोठा धक्का बसला. कुटुंबातील माणूस सोडून कसा जाऊ शकतो असे वाटत होते. त्यातून सावरताना खूप वेळ लागला. भुजबळ यांनी शिवसेना सोडायला नको होती, अशी खंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमात भाषण करताना बोलून दाखवली. यावेळी मंचावर बसलेले भुजबळ भावूक झालेले पाहायला मिळाले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांचा आज ७५वा वाढदिवस आहे. यानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते आज मुंबईत एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे म्हणाले, भुजबळ यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली. पहिली निवडणूक ते हरले. मात्र, त्यानंतर जिद्दीने उभे राहिले आणि आज तुमच्यासमोर ७५ वा वाढदिवस साजरा करीत आहोत. यावेळी ठाकरेंनी भुजबळ यांच्यासंबंधित शिवसेनेतील अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी भुजबळ भावूक झाले होते. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते, असेही म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



