पुणे (प्रतिनिधी) लाडू, चकलीशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. लाडू, शेव आणि चकलीसाठी प्रामुख्याने वापर केला जातो, तो डाळींचा. याच डाळींच्या भावात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सण-उत्सवात डाळींना नेहमीच मागणी वाढते. मात्र, त्यात जास्त मागणी असते ती हरभरा डाळीला. प्रत्येक सणाला काय विशेष करणार, असे म्हणून अनेकजण पुरणपोळीचा घाट घालतात. त्यामुळे तूर, मूग, उडीद डाळीबरोरच हरभरा डाळीला वर्षभर मागणी असते. सण- उत्सवात त्यात आणखी भर पडते. दिवाळीत चकलीसाठी लागणारी भाजणी बनविण्यासाठी हरभरा, उडीद, मूग या डाळींचा वापर केला जातो. तसेच बेसन लाडू, शेव आदी पदार्थ बनसविण्यासाठी बेसणपीठाची अर्थातसाठी हरभरा डाळीची गरज असते. त्यामुळे दिवाळीत प्रामुख्याने नेहमीपेक्षा अधीक डाळीची खरेदी केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बसरत असलेल्या पावसाचा डाळवर्गीय पिकांना फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिणामी उत्पादनात २० ते ३० टक्के घट झाली. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यात डाळीच्या भावात वाढ झाली आहे. सर्वाधिक तूरडाळीच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे १० ते १५ रुपये वाढ झाली आहे. उडीद डाळीच्या भावात ५ ते १०, हरभरा आणि मुगडाळीचे भावात ५ ते ७ आणि मसुरच्या भावात २ ते ४ रुपये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.



