मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी भाजपने अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, अनेक राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर भाजपने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे लटके यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


