मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी रात्रीपासून यावर मंथन करत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शरद पवार यांनी यावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगताच शरद पवारांनी “सहा ते सात अपक्ष आहेत. एक जरी अपक्ष उभा राहिला तर निवडणूक होईल,” असं सांगितलं. “माझी भाजपाकडे कोणतीही मागणी नव्हती. मी त्यांना कसं काय सुचवू शकतो. मी फक्त सल्ला दिला होता. सुचवल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा होती. तसा निर्णय घेतला याचा आनंद आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं. उशिरा झाला असला तरी निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले.



