बारामती : येथील अजिंक्य संस्था व बारामती नगरपालिकेच्या वतीने आयोजित दान उत्सव या उपक्रमामध्ये बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 15 टन जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. दरवर्षी दिवाळीचे औचित्य साधून दान उपक्रम आयोजित केला जातो. ज्यांची परिस्थिती नाही, अशा गरजू लोकांना या दान उत्सवामध्ये जमा झालेले साहित्य विनामूल्य वाटप केले जाते.
बारामती मध्ये नगरपालिकेसमोर तीन हत्ती चौक, तसेच एमआयडीसी व मोरगाव रस्त्यावर नंदन पेट्रोल पंप या तीन ठिकाणी बारामतीकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे वस्तू आणून दिल्या.यामध्ये कपड्यांसह खेळणी व इतरही जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. एकाच दिवसात जवळपास 15 टन इतक्या वस्तू बारामतीकरांनी उपेक्षितांसाठी देऊ केल्या. यामध्ये अनेकांनी नवीन वस्तू आणून दिल्या तर काहींनी जुने कपडे स्वच्छ धुऊन इस्त्री करून व्यवस्थित पॅकिंग करून या संस्थेकडे सुपूर्द केले.



