मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यशवर्धन राजवर्धन कदमबांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारसदार माजी खासदार संभाजीराजे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घ्यायला नकार दिला. संभाजीराजे यांच्या उमेदवारीपासून झाली. त्यांना भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर संधी दिली. भाजपने त्यांच्या खासदारकीला मुदतवाढ दिली नाही. म्हणून महाविकास आघाडीने आपल्याला राज्यसभेवर पाठवावे असे त्यांचे प्रयत्न होते. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेची होती. त्यांनी अगोदर शिवबंधन बांधा असा आग्रह धरला. त्यास संभाजीराजे तयार झाले नाहीत. तरी या राजघराण्याची पाती असलेल्या धुळ्याच्या कदमबांडे घराण्याचे वारसदार यशवर्धन कदमबांडे यांनी मात्र शिवसेनेची मशाल हाती घेतली.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यशवर्धन हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य आहेत. त्यांचे वडिल राजवर्धन कदमबांडे हे भाजपचे नेते असून धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. यशवर्धन यांच्या शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवेशाशी कोल्हापूरचेही कनेक्शन आहे.
कोल्हापूरच्या राजर्षि शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांच्या ताराबाई व विजयाराणी या पत्नी होत्या. ताराबाई यांची कन्या पदमाराजे व त्यांची हर्षवर्धन व राजवर्धन कदमबांडे ही मुले. त्यातील हर्षवर्धन यांचा १९९९ ला अपघाती मृत्यू झाला. विजयमाला राणीसाहेब यांनी पदमाराजे यांच्यावर जिवापाड प्रेम केले.



