मॉस्को – युक्रेनमधील धान्य निर्यातीला सहकार्य करण्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने झालेल्या करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. त्यामुळे काळ्या समुद्रातून युक्रेनच्या मालवाहू जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य होणार आहे. रशियाच्या या बदललेल्या भूमिकेमुळे अन्नसुरक्षेच्या संभाव्य धोक्यापासून जग सुरक्षित राहू शकणार आहे.
रशिया आणि तुर्कीच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चे नंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसिप तय्यिप इर्दोगन यांनी रशियाच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल संसदेत माहिती दिली. युक्रेनची जहाजे आजपासून पुन्हा एकदा काळ्या समुद्रातून प्रवास करू शकणार आहेत, असे इर्दोगन यांनी सांगितले. रशियाने धान्य वितरणाच्या करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, या वृत्ताला अपेक्षित आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. जहाजांच्या प्रवासाच्या सागरी मार्गावर लष्कर न ठेवण्याची ग्वाही युक्रेनने दिली आहे.
ही हमी पुरेशी आहे. म्हणूनच रशियाने या धान्य वितरणाच्या करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
धान्य वितरणाबाबतच्या या करारानुसार ९.७ दशलक्ष मेट्रीक टन धान्य काळ्या समुद्रातून अन्य देशांना पुरवण्यासाठी युक्रेनमदील बंदरांमधून जहाजांद्वारे रवाना करण्यात येत आहे. रशिया, तुर्की, संयुक्त राष्ट्र आणि युक्रेनच्या संयुक्त तपास पथकांकडून या जहाजांची तपासणी केली जाणे.
या संदर्भातील करार संयुक्त राष्ट्र आणि तुर्कीच्या मध्यस्थीने जुलै महिन्यातच करण्यात आला आहे. मात्र युक्रेनने काळ्या समुद्रात रशियाच्या जहाजांवर ड्रोन हल्ले केल्याचे आरोप करून रशियाने या करारातून एकतर्फी माघार घेतली होती.




