मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान केले जाईल. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी ८ डिसेंबर रोजी लागणार आहे. १४ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. १७ नोव्हेंबर अशी आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये एकूण ४.९० कोटी मतदार आहेत. यात दोन कोटी ५३ लाख पुरुष आणि दोन कोटी ३७ लाख महिला आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या १४१७ आहे. तीन लाख २४ मतदार पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५१७८२ मतदान केंद्र असून, १८२ मॉडल पोलिंग स्टेशन असतील. ५० टक्के मतदान केंद्रांचे लाइव्ह प्रसारण केले जाणार आहे, तर ३३ पोलिंग बूथवर युवा पोलिंग टीम असेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ पुढील वर्षी १८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. १८२ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ९२चा आकडा गाठावा लागणार आहे. १३ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २७ मतदारसंघ अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत.
भाजप गुजरातच्या १९९५ पासून सत्तेवर काबीज आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे ७७ आमदार निवडून आले होते. मात्र, पुढे चालून त्यातील अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या काँग्रेसची संख्या ६२ एवढी आहे.


