नवी दिल्ली : देशात ६ राज्यांतील महाराष्ट्रासह ६ राज्यांतील विधानसभांच्या ७ जागांवर गुरुवारी पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले. आता ६ नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निकालांविषयीची उत्सुकता वाढली आहे. –
बिहारमधील २, तर महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशा या राज्यांतील प्रत्येकी एका मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे अवघे ३१.७४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदानाची (७७.५५ टक्के) नोंद तेलंगणात झाली. बिहारमध्ये ५२ ते ५३ टक्के, हरियाणात ७५ टक्के, उत्तर प्रदेशात सुमारे ५६ टक्के, तर ओडिशात ६७ टक्के मतदान नोंदले गेले. पोटनिवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या ७ पैकी सर्वाधिक ३ जागा भाजपकडे, तर त्याखालोखाल २ जागा काँग्रेसकडे होत्या. शिवसेना आणि राजदकडे प्रत्येकी १ जागा होती. त्या पोटनिवडणुकांचा संबंधित राज्यांमधील राजकीय समीकरणांवर फारसा परिणाम होणार नाही. तरीही राजकीय प्रतिष्ठेचा भाग म्हणून विविध पक्ष त्या पोटनिवडणुकांना ताकदीने सामोरे गेले. त्यामुळे पोटनिवडणुकांच्या निकालांविषयी उत्सुकता बळावली आहे.



