सिमला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत गुंतले आहेत. त्यामुळे ते गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांतील प्रचारासाठी फारसा वेळ देऊ शकणार नसल्याचे सूचित झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या सरचिटणीस आणि राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी हिमाचलातील पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत.
प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हिमाचलमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्या प्रचारासाठी हिमाचलात दाखल झाल्या. कांगडामध्ये जाहीर सभा घेत त्यांनी मतदारांवर अनेक आश्वासनांची खैरात केली. हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास १ लाख रोजगार उपलब्ध केले जातील.



