मुंबई: अंधेरी पोट निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील, राजकीय चिता पेटवत राहील. असे म्हटले जाते. तर भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळला अशी टीका शिवसेनेने केली आहे.
‘भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते’ असं म्हणत शिवसेनेनं जोरदार भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विक्रमी मतांनी विजयी झाल्यात. मशाल चिन्हाखाली शिवसेनेचा हा पहिला विजय आहे.
याच निकालाबद्दल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यात आलं. (‘आम्ही माघार घेतली म्हणून लटकेंचा विजय’, गुलाबराव पाटलांचा असाही दावा) ‘पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला.
धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिंध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली. हाती मशाल हे चिन्ह घेऊन नव्या लढय़ासाठी सज्ज झाली. जनता जनार्दनाचा हा संताप पाहून भाजप मिंधे गटाचे उमेदवार कोणी मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून’ अशी जळजळीत टीका सेनेनं भाजपवर केली.
‘मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. आमची मनापासून इच्छा होती, भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता’ असा टोलाही सेनेनं शिंदे गटाला लगावला.
‘भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही.
‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले’ अशी टीकाही शिवसेनेनं भाजपवर केली.
‘मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारडय़ात भरभरून मतदान केले आणि भाजप-मिंध्यांचे कारस्थान उधळून लावले. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे. ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गं मतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले. पेच व कारस्थाने करणाऱ्यांना सोयीनुसार ईश्वर आठवतो हेच खरे!
पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील, असा टोलाही शिवसेनेनं फडणवीसांना लगावला.


