मुंबई : बाजारातील रोख रकमेचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर डिजिटल व्यवहारालाही प्राधान्य दिले असे असले तरी प्रत्यक्षातील चित्र मात्र नेमके उलट असल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ ऑक्टोबरच्या स्थितीनुसार आज बाजारात तब्बल ३० लाख ८८ हजार कोटी रुपयांच्या चलनी नोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्या दिवशी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजारात एकूण ज्या नोटा चलनात होत्या त्या सुमारे १७ लाख ७० हजार कोटींच्या होत्या. त्या तुलनेत सध्या चलनात असलेल्या नोटांचे प्रमाण तब्बल ७१.८४ टक्क्यांनी जास्त आहेत. यात बँकांकडे असलेली रोकड जमेस धरण्यात आलेली नाही. ती जमेस धरली तर चलनी नोटांचे प्रमाण खूपच अधिक आहे. आरबीआयच्या अहवालातच ही आकडेवारी देण्यात आली आहे.
काळा पैसा नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा एका फटक्यात चलनातून बाद केल्या होत्या. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता वरील आकडेवारीनुसार चलनी नोटांचा वापर कमी होण्याऐवजी वाढलेलाच दिसून आल्याने नोटाबंदीचा हाही हेतू सफल झाला नसल्याचे दिसून आले आहे.




