वॉशिंग्टन ; आधुनिक काळातील ताणतणावामुळे जगातील सर्वच देशांमध्ये तरुण वयात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनातील आत्महत्येचे विचार आधीच समजणे शक्य असल्याने या आत्महत्या टाळता येणेही शक्य झाले आहे. जीपीएस आणि डिजिटल बैंड या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार तयार होत असतील तर त्याची माहिती आधीच मिळणार आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून हे तंत्र विकसित केले आहे. संशोधकांनी काही निवडक व्यक्तींच्या मोबाइल फोनमध्ये काही विशिष्ट अॅप प्रस्थापित केली आहेत. या अॅपच्या माध्यमातून मानसिक हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीच्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे त्याच्या मनगटावर एक डिजिटल बँडही बांधण्यात आला आहे. ज्या तरुणांनी गेल्या काही कालावधीमध्ये मानसिक उपचार करून घेतले आहेत अशा लोकांना या प्रयोगासाठी निवडण्यात आले आहे.
लीना क्रूज ही अशाच पैकी एक तरुणी असून तिच्याही मोबाईलमध्ये हे अॅप प्रस्थापित करण्यात आले आहे आणि मनगटावर बँड बांधण्यात आला आहे. तिच्या जीपीएसच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या हालचाली टिपणे शक्य असल्यामुळे त्या व्यक्तीची अस्वस्थता लक्षात येणार आहे. ती व्यक्ती घराबाहेर पडते आहे की घरातल्या घरामध्ये फेऱ्या मारत असेल तर त्याचा अर्थही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लावला जाणार आहे. एखादी व्यक्ती घरातच विनाकारण फेऱ्या मारत असेल तर ती अस्वस्थ आहे असा निष्कर्ष काढणे शक्य आहे.
डिजिटल बँडच्या मदतीने त्या व्यक्तीच्या झोपेचाही अभ्यास करण्यात येणार आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉक्टर मॅथ्यू नॉक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्यांच्या हातावर हा डिजिटल बैंड आहे त्यांची मानसिक स्थिती समजणे आता सहज शक्य होणार आहे. हा डिजिटल प्रयोग सुरू असतानाच ज्यांना या प्रयोगात सामील करून घेण्यात आले आहे, त्यांच्याकडे एक प्रश्नांची सूची ही पाठवण्यात येते. या प्रश्नांना हे लोक ज्याप्रकारे उत्तर देतात त्यावरूनही त्यांची मानसिक स्थिती समजणे शक्य होते. या सर्व संशोधनाचा अभ्यास करूनच एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार तयार होत आहेत का याबाबतचा निष्कर्ष संशोधक करण्यात आले आहे.




