खेड : राजगुरुनगर येथे आलेल्या मेरठ (उत्तर प्रदेश) येथील इरफान अमिरुद्धीन तेली ऊर्फ मियाँ सुफीजी बाबा याला भोंदूगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी गुरुवारी (दि. १७) ताब्यात घेतले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना या बाबाच्या भोंदूगिरीची माहिती मिळाली. त्यानंतर राजगुरुनगर येथील बसस्थानकाजवळील इमारतीत कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून हा बाबा मोहिनी वशीकरण करण्यासाठी पैसे घेत लुबाडणूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या कायदेशीर सल्लागार अॅड. साधना बाजारे यांनी खेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार इरफान अमिरुद्धीन तेली ऊर्फ मियाँ सुफीजी बाबा (रा. अमिरुद्धीन हाऊस न्यू इस्लामनगर कॉलनी, लखखीपुरा रोड मेरठ, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. बसस्थानकासमोर, राजगुरुनगर, ता. खेड) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित भोंदूबाबाने पूजेसाठी पैशांची मागणी केली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी अॅड. बाजारे व अंनिसचे वामन बाजारे, शाम राक्षे, अलका जोगदंड, मनोहर शेवकरी, रविराज झरेकर यांनी बसस्थानकाजवळ मियाँ सुफीजी बाबा यांचेकडे समस्या घेऊन गेल्यानंतर भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने पैसे घेऊन फसवणूक केली, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भोंदूबाबाकडून करण्यात आलेल्या पैशांच्या मागणीचे आणि पैसे स्वीकारल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केल्याचेदेखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
खेड पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. या कारवाईत अंनिसच्या अॅड. साधना बाजारे, अलका जोगदंड, चाकणचे बुवाबाजी संघर्षचे श्याम राक्षे, रविराज झरेकर, मनोहर शेवकरी आदी सहभागी झाले होते..




