राजगुरूनगर : प्रियकराच्या प्रेयसिने पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर मध्ये उघडकीस आली आहे. खुनातील आरोपी स्वाती सुभाष रेंगडे, वय २१,रा सध्या शेवंता पार्क, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर, मूळ गाव गोद्रे, ता जुन्नर आहे.
पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या पत्नीचा गळा आवळून खुन झाला होता. हा खुन मयत पतीच्या प्रेयसिने केल्याचा तपास करून या प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे. खेड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटना घडल्यावर दोन दिवसांत महिलेच्या खुनाचा उलगडा करून पतीच्या प्रियसीला जेरबंद केले आहे.
मयत कोमल गणेश केदारी ही बुधवारी(दि १६ ) राजगुरुनगर शहरातील शिवसाम्राज्य सोसायटी, राजगुरूनगर येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा पती गणेश भिकाजी केदारी हा नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेला होता.दुपारी एकटी घरात झोपली असताना तिचा कोणीतरी आज्ञात इसमाने गळा आवळुन खून केला होता.खेड पोलिस ठाण्यात दुसऱ्या दिवशी अज्ञात इसमा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही पुरावा नसताना खून कोणी केला असेल ? याबाबत पोलीसां पुढे मोठे आव्हान होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार खेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहिती मार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन दिवसात गुन्हयाची उकल केली. मृत महिला कोमल गणेश केदारी हीचा पती गणेश केदारी ह्याच्या प्रियसीनेच हा खून केला असल्याचे निष्पन्न करून आरोपीला अटक केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे,उप विभागीय पोलीस अधिकारी खेड विभागचे सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेडचे पोलीस निरिक्षक विजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड , अभिजीत सावंत, विक्रम तापकीर, राजू मोमीन , निलेश सुपेकर, दगडु विरकर,शंकर भवारी, कैलास कड, संतोष घोलप , संतोष मोरे, सचिन जतकर, प्रविण गेंगजे, निलम वारे यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.




