मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करणेबाबत गृहमंत्री श्री अमित शाह यांना निवेदन दिले.@AmitShah pic.twitter.com/P07CAlnkXZ
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 23, 2022
उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीदेखील पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्देवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असं उदयनराजे आपल्या पत्रात पंतप्रधानांना उद्देशून म्हटले आहे.
२० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे. आणि दुसरे वक्तव्य हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो असं खासदार उदयनराजे म्हणाले आहेत.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केलाच आहे. पण यापूर्वीही त्यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी तक्रार उदयनराजे यांनी केली.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. हे सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांना जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वत: बदलायला तयार नाहीत”, असं उदयनराजे म्हणाले आहेत.



