पुणे, दि. 23 -जिल्ह्यातील युवक-युवतींची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. येत्या शुक्रवारी (दि. 25) जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील महाविद्यालयांमध्ये नवतरुण मतदारांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार दि.9 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. 8 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीतील लक्षित गटांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना नोंदणीसाठी दि. 8 डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करता येणार आहे.
येत्या दि. 25 नोव्हेंबर रोजी एकाच वेळी एकूण 450 महाविद्यालयांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र युवा मतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.




