लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष अर्थात एसबीएसपी यांनी एकत्र लढवली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आले. एसबीएसपीचे प्रमुख ओ. पी. राजभर यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर अनेकदा जाहीर टीका केल्यानंतर दोन्ही पक्षांमधील वाद टोकाला गेला आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने एसबीएसपीच्या कार्यकर्ता संमेलनात बारबाल नाचत असल्याचा व्हिडिओ जारी केल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.
सपाचे नेते राजीव राय यांनी हा व्हिडिओ जारी केला त्यासोबत असून एक कॅप्शनही त्यांनी दिली आहे. छडीची (एसबीएसपीचे निवडणूक चिन्ह ) नवी बारबाला आहे हा असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांच्या या व्हिडिओला आणि त्यासोबतच्या कॅप्शनला राजभर यांचे पुत्र अरूण राजभर यांनी उत्तर दिले आहे. समाजवादी पक्षाच्या सैफई महोत्सवात कोणकोणते ठुमके होत होते आणि कोण कोणत्या गाण्यावर नाचत होते हे सगळ्यांनी पाहिले आहे. समाजवादी पक्षाचे नावच ठुमका पार्टी का ठेवत नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. सत्तेतून बाहेर गेल्यावर ते का महोत्सव घेऊ शकले नाहीत? जनतेच्या पैशाने ठुमका पाहणाऱ्यांनी काही न बोललेलेच बरे असेही राजभर यांनी सुनावले आहे.
दरम्यान, या दोन पक्षांमधील सोशल मीडिया वॉरवर काही इंटरनेट वापरकर्त्यांनही सहभाग घेत टिका टिप्पणी सुरू केली आहे. त्यात काहींनी समाजवादी पक्षाची तर काहींनी एसबीएसपीची बाजू घेतली आहे.




