पुणे : रिक्षा संघटनांच्या बंदच्या पार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने शहरात जादा बस सोडल्या होत्या. रिक्षा बंद असल्यामुळे पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असून पीएमपीला सोमवारी सकाळच्या सत्रात एक कोटी 15 लाख 27 हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. रिक्षा बंदमुळे पीएमपी मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवन वाहिनी म्हणून पीएमपीला ओळखले जाते. दररोज 1600 ते 1700 बसमार्फत सेवा दिली जाते. बाईक-टॅक्सी विरोधात रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून सोमवार पासून बेमुद बंद सुरू केला आहे. बंदच्या पाश्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने सोमवारी 100 जादा बस सोडल्या होत्या. सोमवारी 1740 बस मार्गावर धावत होत्या. यातून पीएमपीला सकाळच्या सत्रात एक कोटी 15 लाख 27 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. इतर दिवशी पीएमपीचे सकाळच्या सत्रात उत्पन्न 80 ते 90 लाख असते पण रिक्षा बंद असल्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात एकाच सत्रात 20 ते 30 लाखाने वाढ झाली आहे.




