गूजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यादरम्यान राज्यभरातून कोट्यावधींची रोक रक्कम जप्त करण्यात आली आहे. मतदानाच्या प्पाहील्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगानेही एक मोठा खुलासा केला आहे.
आयोगाने म्हटले आहे की, गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम, दारू आणि मोफत भेटवस्तू जप्त करण्याच्या विक्रमी पातळीवर कारवाई करण्यात आली आहे. ही जप्ती 290 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्यातील संपूर्ण 2017 विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या जप्तीपेक्षा जप्तीचा हा आकडा 10 पट अधिक आहे.
निवडणूक आयोगाची कारवाई
विविध तपास यंत्रणांनी सुनियोजित पद्धतीने केलेली कारवाई केल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान रेकॉर्ड जप्ती करण्यात आली आहे. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एकूण 27.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. यावेळी 29 नोव्हेंबरपर्यंत एकूण 290.24 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे 2017 मधील जप्तीच्या 10.66 पट आहे. ही जप्तीची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनीही पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असल्याची माहिती दिली. यासाठी निमलष्करी दलासह अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोकांना कोणतीही भीती न बाळगता मतदान करता यावे यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
2022 च्या गुजरात निवडणुकीत गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी एकूण 2,39,76,670 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या टप्प्यात एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य 1 डिसेंबरला ईव्हीएममध्ये सील होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये आहे.




