बुलढाणा : राज्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली, पुढच्या दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही असं विधान भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून त्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी देखील रावसाहेब दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावर विनायक राऊत म्हणाले, रावसाहेब दानवे प्रथमच खरे बोलले आहे. एकनाथ शिंदे यांना घेऊन नसती आपत पदरात पाडून घेतली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ते डोईजड व्हायला लागले आहे. भारतीय जनता पार्टीची गरज भागली आहे, उद्धव ठाकरे यांना पदापासून दूर ठेवण्याचे कारस्थान होते ते पूर्ण झाल्याने आहे. त्यातच नाकामागून आले आणि डोईजड झाले आहे. शिंदे सरकार त्यांना परवडणारे नाही त्यामुळे शिंदे सरकारच्या विसर्जनाची घंटा रावसाहेब दानवे यांनी वाजवल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा आधार घेत शिंदे-फडणवीस सरकारवर विनायक राऊत यांनी टोलेबाजी केली आहे. शिंदे सरकारच्या विसर्जनाची घंटा रावसाहेब दानवे यांनी वाजवली असल्याचे विनायक राऊत यांनी म्हणत सरकारला चिमटा काढला आहे.
शिंदे-सरकार येऊन जवळपास चार महीने उलटून गेले आहे, त्यात विरोधकांनी नेहमीच हल्लाबोल करत शिंदे सरकारला धारेवर धरलेले असतांना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भुवया उंचवणारे विधान केले आहे.


