पुणे : रिक्षा चालकांच्या आंदोलनामुळे पुण्यातील सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. पुण्यात सुरू असलेली ‘रॅपिडो’ बाईक सर्विस बंद करावी अशी येथील रिक्षा चालकांची मागणी होती. ‘रॅपिडो’ बाईकचं भाडं तुलनेने कमी असतं, त्याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत असल्याचं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. ही बाईक सेवा बेकायदेशीर असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ‘रॅपिडो’ बाईक सर्विस तात्काळ बंद करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने रिक्षा चालक सहभागी झाले आहेत.
‘रॅपिडो’ बाईक सेवा सुरू झाल्यानंतर शहरात वर्षानुवर्षे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांना याचा फटका बसतो आहे. बहुतेक स्थानिक लोक ‘रॅपिडो’ बाईक सेवेचा वापर करत आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायवर याचा परिणाम होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
काय आहे ‘रॅपिडो’ वाद
रॅपिडो’ने पुण्यात त्यांची बाईक-टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितलं होतं, की आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा एक भाग म्हणून पुढील दोन वर्षात दोन लाख दुचाकी चालक या रॅपिडोशी जोडले जातील. मात्र, महाराष्ट्राच्या मोटार वाहन विभागाने या सेवेसाठी कंपनीला परवानगी दिली नसून ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. मुंबईच्या परिवहन विभागाने ‘रॅपिडो’ या अॅप आधारित बाइक-टॅक्सी सेवा कंपनीला तातडीने सेवा बंद करण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अद्याप कंपनीला अशा प्रकारे व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली नाही.




