गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया गुरुवारी (दि.1) रोजी पार पडली. पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान झाले आहे. मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 68 टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा पहिल्या टप्पामध्ये सुमारे 62. 92 टक्के मतदान झाले आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याने त्याचा फटका कुणाला बसणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील ऊर्वरित 93 जागांसाठी येत्या 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, सध्या तरी या घटलेल्या टक्क्यावरुन काय काय निकाल लागेल याचे अंदाज बांधले जात आहेत.
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये यावेळी घट झालेली आहे. 10 वर्षातील सर्वात कमी मतदान यावेळी झाले आहे. 19 जिल्ह्यातील 89 जांगासाठी 62.92 टक्के मतदान झाले. २०१७ मध्ये 68 टक्के मतदान झाले होते. यावेळी ५ टक्क्यांनी मतदान घटले आहे. या 89 मतदार संघापैकी १६ जागा आदिवासी बहुल, तर ३२ जागा या पाटीदार बहुल आहेत. नर्मदा आणि तापी जिल्ह्यांमध्ये मात्र, ७० टक्के मतदान झाले. हे दोन्ही आदिवासी बहुल जिल्हे आहेत. आदिवासी भागात जास्त मतदान झाले, तर पाटीदार बहुल भागामध्ये कमी मतदान झाले आहे. मोरबी जिल्ह्यामध्ये ६५ टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले आहे.
या निवडणुकीत नव मतदारांची संख्याही घटली आहे. भाजपचा (BJP) पगडा हा शहरी भागात आहे, मात्र, शहरी भागातही कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत मतदान जास्त झाले तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट असते, असे मानले जाते. मात्र, गुजरात निवडणुकीचे ट्रेंड वेगळच सांगतात. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ४ टक्के मतदान कमी झाले होते. त्यामध्ये भाजपच्या १५ जागा घटल्या होत्या. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकींचा विचार केला तर भाजपला फटका बसला होता. काँग्रेसच्या (Congress) जागा वाढल्या होत्या.
आता जवळपास पाच टक्के मतदान कमी झाले आहे. या ८९ जगांमध्ये शहरी, पाटीदार, आणि आदिवासी असे मतदार संघ आहेत. मागील निवडणुकीत शहरांमध्ये भाजपला चांगल्या जागा मिळल्या होत्या. मात्र, यावेळी शहरी भागात सुद्धा 11 टक्के मतदान घटले आहे. शहरी भाग हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गुजरामध्ये कमी मतदान झाले की भाजपसाठी धोक्याची घंटा असते, असे मागील आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
२००७ मध्ये पहिल्या टप्प्यात 61 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये भाजपला 61 टक्के जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या होत्या. २०१२ मध्ये भाजपला मोठा विजय मिळाला होता. ७२ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये भाजपला 63 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीमध्ये ४ टक्यानी मतदानाचा टक्का घसरला होता, त्यामध्ये भाजपला ४८ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे भाजपला १५ जागांचा फटका बसला होता, तर काँग्रेसच्या २२ वरुन ३८ वर गेल्या होत्या. मतदानाचा टक्का घटल्यमुळे काँग्रेसला फायदा झाला होता.
मात्र, यावेळची निवडणूक ही तिरंगी आहे, मागील तीनही निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होती. मात्र, आता आम आदमी पार्टी (AAP) मैदानात आहे. त्यामुळे गणित बदलू शकते. परंतु घटलेला टक्का कोणाला फटका देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल, तरी मागील आकड्यांचा विचार करता सध्या तरी भाजपचे टेन्शन वाढलेले असल्याचे दिसत आहे.




