पुणे : जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि. 2) संपली; मात्र थेट सरपंच निवड मतदारातून होणार असल्यामुळे गावागावांतील निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीला ब्रेक बसणार आहे.
सदस्य पदासाठी नाही तर थेट सरपंच पदासाठी गावप्रमुख जोमाने मोर्चेबांधणी केली आहे. थेट निवडीमुळे प्रत्येक गावातील एक सदस्य संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तरुणांचा कल वाढला असल्याने ज्येष्ठांना यंदा निवडणुकीत तरुणांचा सामना करावा लागणार आहे.
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच आता निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जिल्ह्यातील 221 गावांमध्ये निवडणुकीला रंग चढू लागला आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत युवक वर्गाचा मोठा कल दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे याची गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे.
येत्या 18 डिसेंबरला तालुक्यातील मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जोमाने सुरू आहे. निवडणूक गावची असली तरी कसोटी तालुकास्तरीय नेत्यांची राहत असल्याने मोठ्या नेत्यांचेही लक्ष या निवडणुकांकडे आहे. विशेष म्हणजे, अनेक गावांत एकाच राजकीय पक्षातील विविध गट आकाराला आले असून या गटांना सांभाळताना गटांच्या परस्परविरोधी आघाड्यांना सांभाळताना तालुकास्तरावरील नेत्यांना कसरत सुरू आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने जबाबदारी असून कोणता उमेदवार सरस ठरू शकतो याचा मागोवा घेत अर्ज भरण्यात आले आहे.
या निवडणुकीत उच्च शिक्षित तरुण, तरुणी आपले नशीब अजमावत असले तरी अर्ज माघारी घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कायकाय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर निवडणुकीत जनता कुणाला पसंती देते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
पॅनलप्रमुखांची गोची…
त्या-त्या आरक्षण प्रवर्गातील तुल्यबळ उमेदवार न मिळाल्याने पॅनेल प्रमुखांची अडचण राहिल्याचे अनेक ठिकाणी घडले आहे. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अनेकांचा नकार आला. त्यातून पॅनेल प्रमुखांची मध्यल्यामध्येच गोची झाली.




