पुणे: पुण्यातील मनसेचे आक्रमक चेहरा असलेले वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्याला आपल्या गटात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
पुण्यातील एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. त्यावेळी अजितदादांनी वसंत मोरे यांच्याशी हस्तांदोलन करत, ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’ असे म्हणत वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्याचे मान्य केले. पण मी मनसे पक्ष सोडणार नाही, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
परंतु, पुण्यातील मनसे पक्षसंघटनेतील अंतर्गत गटबाजी पाहता वसंत मोरे यांचा हा निर्धार आणखी किती दिवस टिकणार, हे पाहावे लागेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर वसंत मोरे हे काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरेल.




