पुणे : बेकायदेशीर – आंदोलन करुन सर्वसामान्य पुणेकारांना वेठीस धरल्याचा ठपका ठेवत रिक्षा चालकांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ३७ रिक्षाचालक व संघटनांचे पदाधिकारी यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.
या रिक्षा चालकांनी सोमवारी पुणे आरटीओसमोर बेमुदत चक्का जाम आंदोलन केले. यामध्ये बघतोय रिक्षावाला फोरमचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटना अध्यक्ष आनंद अंकुश, संजय कवडे, अशोक साळेकर, किशोर चिंतामणी, अजीज शेख, फारुक बागवाले, बाबा सय्यद, शिवा भोगनळी या अध्यक्षांच्या संघटनांसह पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्यासह बैठक घेऊन अशा प्रकारे आंदोलन न करण्याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आवाहन केले होते. तसेच सहायक पोलीस आयुक्त आर. एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनीही बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेऊन आंदोलन न करण्याबाबत आवाहन केलेले होते.
यावर महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर संघटना हे आंदोलनावर ठाम राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यानंतरही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. तसेच रिक्षा पार्क करुन आर. टी. ओ. चौकातील संपूर्ण वाहतूक अडवून ठेवली. काहींनी दगड भिरकावले. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वाहतूक सुरळीत करत असताना त्यांच्या अंगावर आंदोलक धावून गेल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.




