पुणे : आंदोलनात – सहभागी न झाल्याने कात्रज भागात रिक्षावर दगडफेक करण्यात आली. रिक्षाची तोडफोड तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी वाट बघतोय रिक्षावाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रिक्षा चालक उदय चंद्रकांत शिर्के (४६ रा. कसबा पेठ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी टॅक्सीच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा संघटनांकडून सोमवारी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा फोडा, जाळा, असे चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले होते. आंदोलनात सहभागी न झालेले रिक्षा चालक शिर्के कात्रज भागातील आंबेगाव परिसरात प्रवासी वाहतूक करत होते. त्यावेळी अज्ञातांनी रिक्षा अडवून रिक्षाची तोडफोड केली. शिर्के यांच्या खिशातील ५०० रुपये हिसकावून नेले. तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.




