काल कराड येथे विजय दिवस समारोप खा.पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
१९७१ च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्काराने पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावत ऐतिहासिक विजय मिळवला. या निमित्ताने कराडमध्ये गेली २४ वर्षे विजय दिवस साजारा करण्यात येतो. यंदा रौप्य महोत्सवी विजय दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय चौकातील विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून या युद्धातील वीर जवानांच्या स्मृतीस अभिवादन केले.
आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आहे. विजय दिवसाच्या सोहळ्याला मोठा इतिहास आहे. सातारा जिल्हा या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांशी संघर्ष करण्यासाठी या जिल्ह्याचे अनेक सुपूत्र पडेल तो त्याग करण्यासाठी सिद्ध झाले. दिवंगत यशवंतराव चव्हाण, कॉम्रेड नाना पाटील अशी अनेक नाव घेता येतील ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली.
स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि स्वतंत्र्य भारताचे समृद्ध भारतामध्ये रुपांतर करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती तो पुढाकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कऱ्हाडचे सुपूत्र यशवंतराव चव्हाण साहेबांनी केला. महाराष्ट्र कसा बदलेल, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीपथावर कसा जाईल याची काळजी चव्हाण साहेबांनी घेतली. देशावर चीनचे संकट आले नंतर पाकिस्तानचे संकट आले. या चीनच्या संकटकाळात महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला आणि चव्हाण साहेबांचे दिल्लीत पदार्पण झाले त्यांनी शपथ घेतली आणि हा संघर्ष त्याठिकाणी थांबला. तसेच चित्र नंतरच्या काळात पाकिस्तानच्या संदर्भात झाले. बांग्लादेश किंवा अन्य लढाई असेल त्या सर्व लढाईत आपल्या देशाच्या जवानांनी पडेल ते कष्ट केले, त्याग केला, शौर्य दाखवले. त्यामध्ये महाराष्ट्राचा आणि विशेषत: सातारा जिल्ह्याचा वाटा हा ऐतिहासिक नोंद होईल अशा प्रकारचा आहे.
मला आनंद आहे की हा सोहळा मागील पंचवीस वर्ष आयोजित केला जातोय त्यासाठी कर्नल पाटील यांनी पुढाकार घेतला आणि केवळ पुढाकार घेतला नाही तर बांग्लादेशच्या लढाईमध्ये आक्रमकपणे भारताची भूमिका मांडून बांग्लादेशच्या स्वातंत्र्याला हातभार लावणारे जे आमचे सर्व शूरवीर होते त्यामध्ये कर्नल पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. या सोहळ्यामध्ये ज्यांनी आपले कर्तृत्व दाखवले त्यांचे अभिनंदन.




