
आज लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रतीक आज इथे दिसतंय, महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. अशा व्यक्तीबाबत टिंगल-टवाळी राज्यपालांकडून होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
महापुरुषांविषयी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं गेलं. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महामोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला.



