पुणे : शहरात एक कोटी रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले १ हजार ६५ मिळकतधारक असून त्यांच्याकडे तब्बल ३ हजार ३३० कोटींची थकबाकी असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. थकबाकी वसुलीकडे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीची रक्कम वाढत आहे.
दोन वर्षांपूर्वी पर्यंत शहरात ४७४ थकबाकीदारांकडे १ हजार २१८ कोटींची थकबाकी होती. मिळकतकर थकल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या निवासस्थानापुढे बॅण्डबाजा वाजविणारी महापालिका बड्या थकबाकीदारांकडील वसुलीसाठी प्रयत्न का करत नाही, अशी विचारणा शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती मागितली होती. त्यामधून ही वस्तुस्थिती पुढे आली आहे.




