बेंगळुरू : अमित शहा हे राजकीय व्यापारी आहेत. त्यांनी कलंकित आणि भ्रष्ट लोकांनाच भाजपमध्ये सामील करून घेऊन त्यांचे शुद्धीकरण करण्याचे काम केले आहे. जे स्वतःच भ्रष्ट आहेत ते काँग्रेसला भ्रष्टाचाराची दूषणे देत आहेत ही गमतीची बाब आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. कर्नाटकातील कार्यक्रमांमध्ये बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या यांनी ही टीका केली आहे.
कर्नाटकातील भाजपच्या ४० टक्के कमिशन सरकारमधील आपला वाटा किती, असा थेट सवालही सिद्धरामय्या यांनी अमित शहांना केला आहे. भरती, बदली, पदोन्नती, वाटप यामध्ये ४० टक्के कमिशन आकारून चुकीच्या कामात बुडलेल्या भाजपच्या कर्नाटक युनिटमधील नेत्यांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांनाच पदावर कायम ठेवून अमित शहा हे भ्रष्टाचाराविषयी बोलत आहेत, हा ढोंगीपणा आहे, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
त्यांनी ट्रिटरवर म्हटले आहे. की, मुख्यमंत्रिपद २,००० कोटी रुपयांना विकणारे गृहमंत्री अमित शहा हे राजकीय व्यापारी आहेत. ते काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, हा मोठा विनोद आहे. ऑपरेशन लोटसमधून जन्माला आलेल्या बेकायदेशीर पोरांचा समावेश असलेल्या राज्यातील भाजप सरकारने स्थापनेपासूनच गरिबांना मरण आणि भ्रष्टाचाऱ्यांना संपत्तीची भेट दिली आहे, त्यांनी विधानसभेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला आहे, असा घणाघाती आरोपही सिद्धरामय्या यांनी ट्विटरवर केला आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी मागितलेल्या ४० टक्के कमिशनमुळे काही कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या आहेत. या कंत्राटदारांना न्याय मिळेल का, असा सवालही त्यांनी केला आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या राजवटीत कर्नाटकला जीएसटी भरपाईचा पूर्ण वाटा मिळालेला नाही, राज्यातील केंद्र प्रायोजित प्रकल्पांसाठी अनुदान जारी करण्यात आलेले नाही आणि अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही, अशी खंतही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.




